उमेदवारी भरण्यासाठी रत्नागिरीत थंडा प्रतिसाद

चार दिवसात केवळ दोन अर्ज दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. मात्र पहिल्या चार दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करायला थंडा प्रतिसाद मिळाला आहे. चार दिवसात केवळ दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर नगराध्यक्ष पदाची पाटी अद्यापही कोरीच आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. नगरसेवकांच्या 32 जागा तर थेट नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. प्रचारासाठी अतिशय कमी कालावधी मिळणार असल्याने उमेदवारांची पुरती दमछाक होणार आहे. निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टोक्ती झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे अवघे चार दिवस उरले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिल्या चार दिवसात सर्वच राजकीय पक्षांनी आस्ते कदम घेतले आहेत. होणारी बंडखोरी टाळण्यासाठी अद्याप प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर देखील केलेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या चार दिवसात केवळ दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस हाती असून अंतिम दोन दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.