उमेदवाराविना जि. प. उपाध्यक्ष निवड बिनविरोध

उदय बने कोरोना पॉझिटिव्ह; दुसऱ्यांदा घडला प्रकार
 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवड उमेदवाराच्या अनुपस्थितीत बिनविरोध झाली. शिवसेनेचे उमेदवार उदय बने कोरोना बाधित आहेत. निवडीवेळी ते उपस्थित राहू शकत नसल्याने सहीचा उमेदवारी अर्ज त्यांच्यावतीने रोहन बने यांनी सादर केला होता.

उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी (ता. 5) निवडणुक झाली. यावेळी प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून होते.
 उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेने ज्येष्ठ सदस्य उदय बने यांचे नाव आधीच जाहीर केले होते. फक्त निवडीचा सोपस्कार पार पडणे शिल्लक होते; परंतु चार दिवसांपुर्वी श्री. बने कोरोना बाधित आढळले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पहिला अहवाल निगेटीव्ह आला आहे; मात्र कोरोनाच्या निकषानुसार चौदा दिवस क्वारंटाईन अत्यावश्यक असल्यामुळे प्रत्यक्ष निवडीवेळी ते हजर राहणे शक्य नव्हते. सोमवारी सकाळी 10 ते 1 या कालावधीत बने यांच्या सहीचा अर्ज सादर करण्यात आला. त्यांच्या अर्जावर रोहन बने हे सुचक होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या उपस्थितीत हा अर्ज निवडणुक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केला गेला. छाननीत तो अर्ज ग्राह्य ठरला. एकमेव अर्ज असल्यामुळे बने यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते. ही निवड झाल्यानंतर अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बांधकाम व आरोग्य समितीचा पदभार उपाध्यक्षांकडे सोपवण्यात आला.

उमेदवार अनुपस्थित असतानाही निवडणुक बिनविरोध झाल्याचा जिल्हा परिषदेच्या इतिहासातील हा दुसरा प्रकार आहे. यापुर्वी मनोहर रेडीज यांची शिक्षण सभापतीपदावर नियुक्ती झाली होती. 2002 ला हा प्रसंग आला होता. रेडीज यांचे नाव जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडीवेळी त्यांच्यावर बायपास झाली होती. त्यांच्या सहीने अर्ज भरण्यात आला होता.