ठाकरे गटाचे आरोप निराधार; शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दावा

रत्नागिरी:- महायुती सरकारने शहरासाठी भरघोस निधी आणला आहे. महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे शहरात सुरू आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देत, खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी सांगितले.

शिवसेनेचे शहराध्यक्ष बिपीन बंदरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पावसाळ्यामुळे रस्त्यांवरील काँक्रेटीकरणाचे काम थांबले होते, ज्यामुळे रस्त्यांची स्थिती बिघडली. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने शहरात खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच, महायुतीच्या कामांवर उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून वारंवार खोटे आरोप केले जात असल्याचा दावा बंदरकर यांनी केला. शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल, असेही ते म्हणाले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावेळी माहिती दिली की, काँक्रिट पॅचेससाठी पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधून नवीन तंत्रज्ञान वापरून शहरात खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. “जनतेला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण महायुतीचे काम पूर्णपणे विकासाभिमुख आहे,” असे सावंत यांनी स्पष्ट केले.

शहराच्या विकासाची गती कायम राखण्याचा महायुतीचा निर्धार आहे. या पत्रकार परिषदेला राजन शेट्ये, सुदेश मयेकर, शिल्पा सुर्वे यांच्यासह रत्नागिरी शहरातील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.