उपनगराध्यक्ष फाळके यांचा सेनेला घरचा आहेर

शहरात कामांकडे दुर्लक्ष; खालच्या भागात माणसेच राहतात

रत्नागिरी:- शहरातील प्रभाग क्र. १ मध्ये पाणी योजनेचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई करून ठेवलेली आहे. रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. शहराती खालच्या भागातील विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे. या भागात माणसं राहात नाहीत का?असा जाहीर सवाल करत उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.  

पालिकेत पत्रकार परिषदेत ते म्हणाले, साळवी स्टॉपला दुसरी पाइपलाईन टाकण्याचे काम तत्काळ करून तत्परता दाखविण्यात आली. मात्र फगरवठार येते पाइपलाइन टाकून रस्ता अडवून ठेवला आहे. त्यामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. पाणी योजनेच्या ठेकेदाराने ही कामे तत्काळ पूर्ण करावी, अन्यथा अनामत रक्कम जप्त करून घेण्याचे आदेश आपण द्यावेत. याकडे दुर्लक्ष केले तर संबधित यंत्रणेविरोधात न्यायालयात दाद मागू, असा इशारा देत रोशन फाळके यांनी याबाबतचा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याचे त्यानी सांगितले.

पाणी योजनेचे काम पालिकेने अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. शहरात पाणी योजनेचे काम सुरू असताना प्रभागातील पाणी योजनेचे काम सुरू झाल्यापासून वारंवार मागे लागुनही ४ वर्ष झाली तरी अपूर्णच आहे. योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश ६ सप्टेंबर २०१७ ला देण्यात आला होता. या कामाची मुदत २४ महिने होती. ५ सप्टेंबर २०१९ ला मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने मुदतवाढीसाठी अर्ज केला. २० सप्टेंबर २०२० पर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर दुसरी मुदत ३१ मार्च २०२१ ला देण्यात आली तर तिसरी मुदत वाढ ३१ डिसंबर २०२१ पर्यंत देण्यात आली अशी माहिती त्यानी दिली.

सर्व प्रभागात योजनेचे काम अपूर्ण
शहरात सर्व प्रभागात योजनेचे काम अपूर्ण आहे. प्रभाग क्र. १ हा बाजारपेठेमध्ये येतो. या प्रभागामध्ये पाइपलाइन टाकण्याचे काम, रस्त्याची खोदाई मोठ्या प्रमाणात झाली आहे. रस्ता पूर्ववत करून दिलेला नाही. काम अपूर्ण असल्याने रस्त्याचे डांबरीकरणाची कामे रखडली आहेत. स्थानिक नगरसवेक म्हणून ही जबाबदारी माझ्यावर आली आहे. जोपर्यंत या प्रभागातील पाण्याच्या पाइप लाईनचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे पालिकेकडे जमा असलेली अनामत रक्कम जप्त करण्याबाबत आपण संबंधित कार्यालयाला आदेश करण्यात यावे.