रत्नागिरी:- अधिक उपचारासाठी आणि आरामासाठी मुंबईहून केरळला रेल्वेने जाणाऱ्या ५५ वर्षीय प्रौढाचा प्रवासातच आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) सायंकाळी रत्नागिरी रेल्वे स्थानकात घडली. सलीम पी. एम. (रा. केरळ) असे प्रौढाचे नाव आहे.
सलीम पी. एम. हे आजारी असल्याने नेत्रावती एक्स्प्रेस गाडीने मुंबईहून केरळला अधिक उपचारासाठी जात होते. रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान गाडी आली असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि घाम फुटला. त्यांना तातडीने तिकीट तपासणीस आणि रेल्वे पोलिसांनी रेल्वेस्थानकावर उतरवून रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. याबाबत रत्नागिरी पोलिस शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.









