पुन्हा भरती प्रक्रिया; सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी:- जिल्ह्यातील उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी नेमणुक सुरु आहे. पहिल्या टप्प्यात 50 टक्केहून कमी प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये स्थानिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केली आहे.
जिल्ह्यातील उपकेंद्र आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी नेमणुक सुरु आहे. राज्यस्तरावरुन ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. हे अर्ज विभागियस्तरावर मागविण्यात आले होते. वेबसाईटवरही याची माहिती दिली गेली होती. रत्नागिरी जिल्हयातील 352 उपकेंद्रांसाठी समुदाय आरोग्य अधिकारी पदे भरणे आवश्यक होते. 352 पदे आवश्यक असताना उमेदवारांचे अर्ज फक्त 134 प्राप्त झाले. या पदासाठी 352 अर्ज प्राप्त झाले, असते तर त्या सर्वांना समुदाय आरोग्य अधिकारी पदावर घेता आले असते. एकुण उमेदवार कमी असल्याने अर्जाची छाननी न करता जेवढे उमेदवार आले त्यांना पात्र करण्यात आले. 50 टक्केपेक्षा कमी पदे भरली गेली. एकुण 117 उमेदवारांची नियुक्ती झाली. सहा महिन्यांचे प्रशिक्षण झाले, त्यांची परिक्षा घेण्यात आली. पास झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. जाहिरात देण्यात आलेल्यांमध्ये स्थानिकांचा टक्का कमी होता. सध्या शिल्लक राहीलेल्या पदांसाठी पुन्हा राज्यस्तरावरुन सर्व जिल्हयांकरिता जाहिरात दिली जाणार आहे. याची नोंद स्थानिक इच्छुकांनी घ्यावी.
दरम्यान, जिल्ह्यात नियुक्ती देण्यासाठी निकष तयार केले आहे. त्यानुसार नेमणुका दिल्या गेल्या आहेत. तरीही अनेकांना योग्य उपकेंद्र मिळालेले नाही. त्यामुळे पदाधिकार्यांच्या किंवा ओळखीच्यांच्या मदतीने नेमणुकीत बदल करुन मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेले काही दिवस अशा व्यक्तींकडून गाठी भेटी सुरु होत्या; मात्र उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे एकालाही नेमणुक बदलून मिळणार नाही अशी तंबी सीईओंकडून मिळाल्याची चर्चा जिल्हा परिषद भवनात सुरु आहे.