उद्योजक किरण सामंत तातडीने मुंबईला रवाना; रत्नागिरी- सिंधुदुर्गच्या जागेचा आज फैसला

रत्नागिरी:- महायुतीच्या जागावाटपात अडथळा होऊन राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. आज सकाळी किरण सामंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होती. या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांना मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत बोलावले जाणे, महत्त्वाची बाब मानली जात आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. भाजपकडून नारायण राणे यांनी आक्रमकपणे या जागेवर आपल्या पक्षाचा दावा सांगितला आहे. तर शिंदे गटाकडून हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्याचे सांगितले जात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत लढण्यासाठी इच्छूक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लढण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र, भाजप ही जागा शिंदे गटाला सोडायला तयार नाही. अशातच आता भाजपकडून कोणत्याही क्षणी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतल्याची चर्चा आहे. आता एकनाथ शिंदे हे किरण सामंत यांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल. भाजपने नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उमेदवारी जाहीर केल्यास किरण सामंत काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

महायुतीमध्ये विशेषत: भाजप आणि शिंदे गटात अनेक जागांवरुन रस्सीखेच सुरु आहे. मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, ठाणे, नाशिक, पालघर, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि दक्षिण मुंबई या नऊ मतदारसंघांमधील महायुतीचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. शिंदे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना भेटून कोणत्याही परिस्थितीत ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरील दावा सोडू नका, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे आता या जागांवर कोण रिंगणात उतरणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. एकनाथ शिंदे यापैकी किती जागा स्वत:कडे राखण्यात यशस्वी ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचा उमेदवार दिल्यास शिंदे गट ताकदीने काम करेल का, ही शंकाही अद्याप अनुत्तरित आहे.