उद्योजक आशिष भालेकर ह. भ. प. शरददादा बोरकर प्रतिष्ठानकडून समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी:- रत्नागिरीतील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आशिष भालेकर यांचा ह. भ. प. शरददादा बोरकर प्रतिष्ठानकडून समाज भूषण पुरस्काराने शनिवारी खंडाळा येथे गौरव करण्यात आला. यावेळी खंडाळा येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

आशिष भालेकर हे खंडाळा पंचक्रोशीत युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. आशिष भालेकर यांनी सरकार मित्र मंडळ स्थापन करत या मंडळाकडून पंचक्रोशीत अनेक सामाजिक कार्यक्रम हाती घेतले. तसेच त्यांनी मल्हार प्रतिष्ठान कडून देखील आपले सामाजिक उपक्रम सुरू ठेवले होते. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून त्यांनी पंचक्रोशीतील क्रीडापटूंना बळ मिळावे यासाठी कबड्डी स्पर्धा, मॅरेथॉन आणि अन्य क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या. तसेच पंचक्रोशीत विविध शैक्षणिक उपक्रम देखील हाती घेतले. त्यांच्या या कार्याची दखल ह. भ. प. शरददादा बोरकर प्रतिष्ठानने घेत त्यांना यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

ह. भ. प. शरददादा बोरकर प्रतिष्ठान, वरवडे यांच्याकडून वै. ह. भ. प. शरददादा बोरकर यांच्या जयंतीनिमित्त आशिष भालेकर यांचा विविध क्षेत्रातील योगदान तसेच सामाजिक क्षेत्रातील अत्त्युच्च योगदान याबद्दल आशिष भालेकर समाज भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे निखिल बोरकर आणि समीर बोरकर तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होती.