उद्योजकांना प्रोत्साहनासाठी स्टार्टअप यात्रा

२५ ते २७ ला जिल्ह्यात दौरे; तीन नवउद्योजकांचा सन्मान

रत्नागिरी:- राज्य शासनाच्या स्टार्ट अप धोरणांतर्गत नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणार्‍या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचे २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत काढली जाणार आहे. यामध्ये सहभागी होणार्‍या नवउद्योजकांसाठी स्पर्धा घेण्यात येणार असून नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणार्‍यांपैकी तिन जणांचा सन्मान केला जाणार आहे.

नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत स्टार्ट अप धोरण जाहीर करण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यात स्टार्टअप विकासाकरिता नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरिता इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्ट अप वीक यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. स्टार्टअप यात्रा २५ ऑगस्टला खेड-चिपळूणात, २६ ऑगस्टला संगमेश्वर-लांजा-दापोली-मंडणगड, २७ ऑगस्टला रत्नागिरी-गुहागर-राजापूर अशाप्रकारे सर्व तालुक्यात येणार आहे. १३ व १४ सप्टेंबरला जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सहभागी स्टार्टअपचे सादरीकरण सत्र होणार आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील नव उद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे. नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे. प्रत्येक जिल्ह्यामधून अव्वल तीन विजेते घोषित केले जातील. यामध्ये दहा हजार ते एक लाख रुपयापर्यंतचे  पारितोषिक देण्यात येणार आहे. यामध्ये सर्व क्षेत्रांचा समावेश असेल. राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल किंवा निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शक सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स सारखे इतर लाभ ही पुरवण्यात येतील. नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरण करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी व उद्योजकांनी आपल्या उद्योगांबाबतचे अर्ज आपल्या नजीकच्या शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमध्ये सादर करावे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा. या यात्रेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक, विद्यार्थी व नाविन्यता परिसंथा यांनी सहभाग घेऊन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले.