रत्नागिरी:- गणेशोत्सवात विश्रांती घेणारा पाऊस पुन्हा रत्नागिरीत बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 5 सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 4) सकाळी 8.30 वाजेपर्यंत सरासरी 1.17 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड, गुहागरमध्ये निरंक नोंद आहे. दापोली 0.10, खेड 5.20, चिपळूण 2.10, संगमेश्वर 1.70, रत्नागिरी 0.20, लांजा 0.90, राजापूर 0.30 मिमी पाऊस झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात गणपती उत्सवात पावसाने काही अंशी विश्रांती घेतली होती. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या पण संततधार नव्हती. काही ठिकाणी कडकडीत ऊनही पडत आहे. खेड, संगमेश्वर तालुक्यातील काही भागात अचानक पावसाच्या सरी पडत आहेत. परंतु रत्नागिरी, चिपळूण, राजापूर भागात म्हणावा तसा जोर नाही. पावसाच्या विश्रांतीमुळे बळीराजा त्रस्त झाला आहे. त्याला दिलासादायक असा अंदाज हवामान विभागाकडून मिळाला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 सप्टेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. वारेही वाहायला लागले होते. काही ठिकाणी हलका पाऊसही झाला; परंतु त्यात जोर नव्हता. सध्या शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.