राज्य सरकारची नवी नियमावली जाहिर
मुंबई:- मिशन बिगिन अगेन अंतर्गत आज राज्य शासनाने लॉक डाऊन मध्ये बंद असलेल्या अनेक नव्या गोष्टींना उद्यापासून म्हणजेच १५ ऑक्टोबर पासून परवानगी दिली आहे. यात ग्रंथालये, मेट्रो रेल्वे, बाग- बगीचे, करमणुकीची खुली सार्वजनिक ठिकाणे खुली करण्यास परवानगी देणारी अधिसूचना जारी केली आहे.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बिझनेस टू बिझनेस प्रदर्शने, आठवडी बाजार, गुरांचे बाजार, याना देखील शासनाने उद्यापासून उघडण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या रेल्वेमधून उतरणाऱ्या प्रवाशांना स्टॅम्पिंग करण्यात येणार असून त्यांना कोविड १९ चे नियम पाळावे लागतील. या नवीन नियमांबरोबरच सध्या प्रतिबंध असलेले इतर उद्योग व्यवसाय बंदच ठेवण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच शेक्षणिक संस्था मात्र ३१ ऑक्टोबर पर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र पदव्युत्तर व संशोधनात्मक शिक्षण घेणाऱ्या ( पीएचडी ) विद्यार्थ्यांना ग्रंथालयांचा वापर करण्यास परवानगी असेल.