उदय बनेंना संधी मिळणार की हुकणार

जि. प. अध्यक्ष निवड; मातब्बर अध्यक्ष पदाच्या शर्यतीत 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेत विक्रांत कदम, बाळशेठ जाधव, अण्णा कदम यांच्यासह शिवसेनेतील ज्येष्ठ सदस्य उदय बने यांच्यात चुरस आहे. गेली अनेक वर्षे शिवसेनेत निष्ठावंत असलेल्या बनेंना अध्यक्षपदाची लॉटरी लागणार की नाही याकडेच लक्ष लागले आहे. यामध्ये माजी मंत्री रामदास कदम, आमदार भास्कर जाधव, खासदार राऊत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विद्यमान पदाधिकार्‍याने राजीनामे सादर केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकार्‍यांच्या निवडीकडे लक्ष लागलेले आहे. अध्यक्षपदी खुल्या गटातील सदस्यांनाही संधी मिळू शकते. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. पाच वर्षातील हे शेवटचे वर्ष असून भविष्यात खुल्या गटातील सदस्यांना संधी मिळणे शक्य नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य उदय बने यांचे संधी मिळावी यासाठी सुरवातीपासूनच प्रयत्न सुरू होते. मागीलवेळी नवीन चेहरा देण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून रोहन बनेंचे नाव पुढे केले गेले. पाचवेळा जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या उदय बनेंना शेवटच्या टर्ममधील संधी मिळेल, अशी अटकळ होती; परंतु चिपळूणमधील बाळशेठ जाधव यांच्यासह पुतण्या आणि आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत यांचे नाव पुढे आल्यामुळे चुरस वाढली आहे. माजी पर्यायवरण मंत्री रामदास कदम यांचे बंधू अरुण उर्फ अण्णा कदम यांचेही नाव चर्चेत आहे. उदय बने यांच्यामागे गॉडफादर नसला तरीही शिवसेनेतील त्यांच्या निष्ठावंतपणाची दखल मातोश्रीवरून घेतली जाऊ शकते. बनेंनी खासदार राऊत, मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेतील अनेक पदाधिकार्‍यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मातोश्रीवरून कुणाच्या नावाला पसंती दिली जाणार याबाबत उत्सुकता आहे. राजकीय परिस्थितीबरोबरच कोरोनातील परिस्थितीत जिल्हा परिषदेचा कारभारला दिशा देण्याच्या उद्देशाने अनुभवाची गरज भासणार आहे. रोहन बने यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा बनून कामकाज चालवले. सव्वा वर्षानंतर निवडणुका असल्यामुळे त्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा कारभार चालवण्यासाठी उदय बनेंचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.