उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे दापोली पोलीस निरीक्षकाविरूद्ध कारवाईचे आदेश

रत्नागिरी:- दापोली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलीस निरीक्षक यांना दिलेला असतानाही २ वर्ष टाळाटाळ केल्याप्रकरणी ना. मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस निरीक्षक श्री विवेक अहिरे यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

याचिकाकर्ते श्री. मिलिंद मुंडेकर यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये ग्रामपंचायत गव्हे, दापोली येथे होत असलेल्या अपहाराबाबतची चौकशी करण्यासंबंधी दापोली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याप्रकरणामध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चौकशी करून आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक यांना दिले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस काढूनही पोलीस निरीक्षक कोणतीही कार्यवाही करत नसल्याने आणि त्याचा फायदा आरोपी घेत असल्याबाबत श्री. मुंडेकर यांनी ना. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या संबंधी अॅड. मोहित दळवी आणि अॅड. प्रितेश कदम यांनी श्री. मुंडेकर यांच्या वतीने प्रखरपणे ना. मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद केला.

दापोली पोलिस स्थानक येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक अहिरे हे गुन्हा न नोंदवता अप्रत्यक्षपणे आरोपीला सहकार्य तर करत नाही ना?, असा प्रश्न उद्भवत असल्याबाबत ना. मुंबई उच्च न्यायालयाने शंका उपस्थित केली आहे. अखेर ना. मुंबई उच्च न्यायालयाने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यासंबंधी निर्देश दिले असून प्रलंबित गुन्ह्याचे जलद गतीने व योग्य प्रकारे तपास करण्यासाठी दापोली पोलिसांना आदेश दिले. तसेच तपासात दिरंगाई होत असल्याचे जाणवल्यास मुंडेकर यांना पुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यास सांगितले आहे. याचिकाकर्ते यांच्यावतीने ॲड मोहित दळवी यांनी काम पाहिले.