रत्नागिरी:- जिल्ह्यातील असंघटीत कामगारांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची माहिती एकत्रित करण्याच्यादृष्टीने शासनाच्या कामगार विभागाकडून “ई-श्रम पोर्टल” विकसित करण्यात आले आहे. यावर नोंदणी करणाऱ्या कामगारांना २ लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.
विविध क्षेत्रात कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, हे कामगार असंघटित असल्याने त्यांच्या वेतनापासून अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा कामगारांची एकत्रित माहिती जिल्हास्तरावर संघटित केली जात आहे. जिल्हा कामगार कार्यालयाकडून ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. ई श्रम कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी eshram.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते. त्यांनतरच ई श्रम कार्ड मिळणार आहे. अपघाती विमा काढल्यावर असंघटित क्षेत्रातील कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्यास आणि त्याचे ई श्रम कार्ड असल्यास त्याच्या वारसाला २ लाख रूपये मिळतात. अपंगत्व आल्यास त्याला १ लाख रूपयांची मदत मिळते. जास्तीत जास्त कामगारांनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने केले आहे.
असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्डच्या माध्यमातून एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या दोन लाखांचा विमा दिला जातो. यासाठी आधार कार्ड मोबाईलला लिक केलेले असावे. मोबाईल नंबर तसेच बँक खातेपुस्तक आणि कामाच्या ठिकाणचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सध्या ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली जात आहे. या कामगारांना अन्य लाभांसह मोफत दोन लाखांचा अपघात विमा दिला जाणार आहे. तसेच त्यांच्या मुलांसाठीही विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगारांनी या ई श्रम पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन एस. एस. आयरे, सहायक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांनी केले आहे .









