रत्नागिरी पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

रत्नागिरी:- राज्यातील ‘दीडशे दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील सर्वोत्तम ३४ पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ७ विविध तांत्रिक घटकांच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनात रत्नागिरीने २०० पैकी १४४.२५ गुण मिळवून हे यश संपादन केले.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात तब्बल २४ लोकाभिमुख आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपक्रम राबवले आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि चॅटबॉटचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.

‘रेड्स ॲप’ मध्ये एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांचे ट्रॅकिंग, गुगल मॅप लोकेशन आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे ॲप गेमचेंजर ठरले आहे. यातून ७ बेपत्ता व्यक्तींचा शोध लागला असून ५ अनोळखी मृतदेहांची ओळख पटली आहे. ‘मिशन जीवन’ मधून जिल्ह्यातील ५०,८०३ एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित करण्यात आली असून, पोलीस स्वतः त्यांच्या घरी जाऊन वाढदिवस साजरा करून त्यांना सामाजिक आधार देत आहेत.
‘रत्नसेतू चॅटबॉट’ च्या मदतीने व्हॉटसॲपवर (९३७१४१५६१२) उपलब्ध असलेल्या या सुविधेमुळे नागरिकांना तक्रार नोंदणी, महिला सुरक्षा आणि आपत्कालीन मदतीसाठी थेट पोलिसांशी जोडले जाणे सोपे झाले आहे. ‘मिशन संवेदना’ अंतर्गत महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत ८० पैकी ७३ गुन्ह्यांत जलद कारवाई करण्यात आली आहे. ‘बंदोबस्त ॲप’द्वारे पोलीस बंदोबस्ताचे लाईव्ह ट्रॅकिंग आणि व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी ठरला आहे.

‘मिशन प्रगती’च्या माध्यमातून १,५६८ फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्याच्या तपासाची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात आली आहे, तर ‘मिशन गती’ अंतर्गत १,७६६ पैकी १,६०४ गुन्ह्यांचा तपास विहित मुदतीत पूर्ण करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत ७० आरोपींना अटक करून ३२ लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास जपणारी ‘डिजिटल गाववारी’ आणि आपत्कालीन मदतीचा पाठपुरावा करणारे ‘मिशन परिपूर्ती’ यांसारख्या उपक्रमांमुळे पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले आहे. तंत्रज्ञानाचा मानवी चेहरा समोर आणणाऱ्या या प्रयोगांचे राज्यभरात कौतुक होत आहे.