ईपीएस १९९५ पेन्शनधारकांचा रत्नागिरीत मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी:- ईपीएस १९९५ अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज रत्नागिरी येथे मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

देशातील सुमारे ७२ ते ८१ लाख पेन्शनधारक आणि त्यांच्या पत्नी अत्यंत कमी रकमेवर उदरनिर्वाह करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेकांना दरमहा १,००० ते २,५०० रुपयांपर्यंतच पेन्शन मिळत असून वाढती महागाई, औषधोपचाराचा खर्च, घरभाडे, वीजबिल आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

किमान १०,००० रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी, नियमित महागाई भत्ता लागू करावा, तसेच पेन्शनधारकाच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के पेन्शन मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय सर्व पेन्शनधारक व त्यांच्या पत्नींना शासनाच्या आरोग्य योजनेत समाविष्ट करून मोफत वैद्यकीय सुविधा द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान घोषणाबाजी करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून मागण्या शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. मोर्चा शांततेत पार पडला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.