रत्नागिरी:- रमजान ईदच्या निमित्ताने शहरातील पाणी पुरवठा नियमित ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेने घेतला आहे. रमजान महिन्यात होणारी मुस्लिम बांधवांची गैरसोय टाळण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला.
याबाबत शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर तसेच माजी नगरसेवक सुहेल मुकादम, माजी नगरसेवक मुसा काझी, माजी नगरसेवक बाळू साळवी, माजी नगरसेवक निमेश नायर, सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर, उमर मुल्ला, ताहीर मुल्ला, साबीर पावसकर, अश्रफ फणसोपकर, आदिल फणसोपकर, गालिब मुकादम, जिब्रान तांडेल, करीम वस्ता व बहुसंख्य नागरिकांनी रमजान ईद पर्यंत शहरातील पाणी पुरवठा नियमित ठेवण्याकरता भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी बाबर यांची भेट घेत मागणी केली.
वाढता उष्मा आणि जलद गतीने खालावत जाणारा पाणी साठा या पार्श्वूमीवर आणि पावसाळा लांबल्यास पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असावा या कारणाने शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय रनप प्रशासनाने घेतला होता. मात्र सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. या कालावधीत मुस्लिम बांधवांची गैरसोय टाळण्याकरिता माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी उद्योजक भय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सीईओ बाबर यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी बाबर यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना ईद पर्यंत शहरात दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.