ईडीचा एवढा वापर स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता: खासदार राऊत

रत्नागिरी:- केंद्रातील भाजप सरकारने या 2 वर्षांत ईडीचा जेवढा दुरूपयोग केला आहे, तेवढा स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता असं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. खासदार राऊत म्हणाले की,  केवळ आपल्या विरोधकांना ठेचून काढण्यासाठी त्यांना त्रास देण्यासाठी ईडीचं बाहुलं समोर काढलं जात आहे. ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. आणि यातूनच एकनाथ खडसे यांचे जावई म्हणा किंवा अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना किंवा प्रताप सरनाईक म्हणा यांच्यावरील कारवाई ही केवळ सरकारची ड्रामेबाजी असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.

भास्कर जाधव हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहे. संसदीय कामकाजामध्ये त्यांचं असलेलं ज्ञान, अनुभव हे खरोखरच वाखाणण्यासारखं असल्याचं खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले. 

 रिफायनरीच्या नवीन जागेबाबत अद्याप काहीही प्रस्ताव नाही. जर पाचही गावांची सहमती असेल तर शिवसेना त्यांच्याबरोबर असेल, परंतु आजपर्यंत त्या गावांमध्ये विरोधाचे ठराव झाल्याचं मी ऐकलेलं आहे. तसेच कंपनीने सुद्धा पर्यायी जागेची मागणी अद्यापही केलेली नाही. त्यामुळे आजतरी बारसू येथे रिफायनरी नाही असं खासदार विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

दरम्यान कोणावर गोळ्या झाडून, कोणाचे मुडदे पाडून जर तो रिफायनरी प्रकल्प करायचा असेल आणि त्यामध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समाधान वाटत असेल तर त्यांनी नारायण राणे यांना मंत्री करावं, पण ज्याप्रमाणे नाणारची रिफायनरी हटविली त्याप्रमाणे जर बारसूच्या लोकांना जर हा प्रकल्प नको हवा असेल आणि त्यांच्यावर जर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाला तर कोणत्याही परिस्थितीत कोणीही येवो तेथून त्यांना हाकलवलं जाईल, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिला.