रत्नागिरी:- प्रत्यक्षात रॉकेट लाँच कसे केले जाते, किती वेगाने ते अंराळात जाते, विशिष्ठ अंतरावर गेल्यानंतर त्याचे भाग कसे वेगळे होतात हे प्रत्यक्ष पहायला मिळाले. हा प्रसंग अवर्णनिय असाच होता. तिन सेकंदात रॉकेट साठ किलोमीटर अंतर कापते अशी माहिती तिथे गेल्यानंतरच समजली, अशी प्रतिक्रिया ‘इस्त्रो’ भेटीनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी प्रभुती संतोष घाग्रुम हिने दिली. मला नक्कीच संशोधक व्हायला आवडेल अशी इच्छाही तिने व्यक्त केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन घडावेत या उद्देशाने रत्नागिरी जिल्हापरिषदेने इस्त्रो, नासा भेटीचा उपक्रम हाती घेतला. त्यातील पहिल्या टप्प्यात २७ विद्यार्थ्यांना त्रिवेंद्रम येथील इस्त्रो या अंतराळातील संशोधन संस्थेत नेण्यात आले. तिन दिवसांच्या या दौर्यात बेंगलोर येथील सर विश्वेश्वरय्या म्युझिअमही विद्यार्थ्यांना पाहता आले. पालकमंत्री उदय सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, एस. जे. मुरकुटे आदींनी प्रत्यक्ष दौर्यात सहभाग घेतला होता. या दौर्यात सहभागी झालेल्या कोन्हवली (ता. मंडणगड) जिल्हा परिषद शाळेतील सातवीची विद्यार्थीनी प्रभुती घाग्रुम हीच्याशी संवाद साधला. पणजी विमानतळावरुन इस्त्रोचा दौरा सुरु झाला. ती म्हणाली, विमानात बसण्याचा पहिलाच प्रसंग होता. सोबत असलेल्या महिला अधिकार्यांमुळे हा प्रवास चांगलाच झाला. उड्डाण करतानाची स्थिती अनुभवायला मिळाली. खुपच आनंद वाटला. बेंगलोरला पोचल्यानंतर दुसर्या दिवशी सर विश्वेश्वरय्या म्युझीअम पाहीले. तिथे उपग्रहांच्या प्रतिकृती, हवेवर चालणारी इंजिन्स, हवेचा दाब कसा असतो याची प्रात्यक्षिकं, पहिल्या विमानाची प्रतिकृती पहायला मिळाली. पुस्तकात किंवा टीव्हीवर पहायला मिळणार्या गोष्टी प्रत्यक्षात पाहता आल्या.
त्रिवेंद्रम येथील इस्त्रोची भेट आमच्यासाठी अवर्णनिय होता असे प्रभुतीने आवुर्जन सांगितले. ती म्हणाली, इस्त्रोमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या तपासण्या झाल्या. तिथे कोणतीही वस्तू नेण्यास परवानगी नव्हती. हे क्षण आमच्या मनामध्येच साठवून ठेवले आहेत. रॉकेट लाँच प्रत्यक्ष कसे होते, हे पाहण्याचा अनुभव आम्हाला मिळाला. ते तिन सेकंदात साठ किलोमीटर अंतर कापते. एवढ्या वेगाने ते पुढे जाते. अवकाशात गेल्यानंतर त्याचे छोटे पार्ट बाजूला होतात आणि मुख्य रॉकेट पुढे जाते. हा अनुभव अंगावर रोमांच आणणारा असाच होता. पृथ्वीभोवती उपग्रह कसे फिरतात हे आम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळाले. तिथे इंग्रजीमध्ये माहिती फलक होते, त्याचे मराठीत भाषांतर करुन सांगितले. या भेटीनंतर मला नक्कीच संशोधक होण्यासाठी अभ्यास करायला आवडेल अशी इच्छाही तिने बोलून दाखवली.









