इर्शालवाडी दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दरडग्रस्त 211 गावांवर विशेष लक्ष

रत्नागिरी:- रायगडमधील इर्शालवाडी येथील दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य दरडग्रस्त 211 गावांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. यासाठी आपत्ती निवारण कक्षांंतर्गत पाच नोडल अधिकार्‍यांची नियुक्तीही केली आहे.

जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढत आहे. डोंगराळ भाग असल्याने काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. आतापर्यंतच्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करता जिल्ह्यात संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये 211 गावांचा समावेश आहे. या गावांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

जिल्ह्यात भूस्खलनाचे प्रकार वाढत आहेत. तीन वर्षापूर्वी खेडमध्ये घरावर डोंगर कोसळून कुटुंबच्या कुटुंबे गाडली गेली होती. दिवसेंदिवस या नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लान तयार केला आहे. दरवर्षी पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या पार्श्वभमीवर प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आपदामित्र आणि सखी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीमध्ये या आपदामित्रांकडून मदतकार्य होणार आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने दरडप्रवण भागातील नागरिकांनाही स्थलांतराच्या सूचनाही प्रशासनाने केल्या आहेत.

गेल्यावर्षी परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकार्‍यांनी या घाटाची पाहणी करून सतर्कता बाळगण्याच्या आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरडग्रस्त गावांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने केले आहेत.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात संभाव्य पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक कामांचे सनियंत्रण व सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधण्यासाठी पाच नोडल अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. खेडसाठी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, राजापूरसाठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) एम. बी. बोरकर, चिपळूणसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक, संगमेश्वरसाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर यांची तर दापोलीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.