चिपळूण:- चिपळूण पालिकेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटासोबत सुरवातीपासूनच महायुती होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र काही कारणामुळे ती झाली नाही. तरीही राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला नाही. मी निकमांचा विश्वासघात केलेला नाही. त्यांची भेट घेऊन समजूत काढणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत महायुतीमधील सामजंस्य दिसेल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चिपळूणात महायुती फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाने पालकमंत्र्यावर तिव्र संताप व्यक्त केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्याला अंधारात ठेवल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले. यावरून पालकमंत्री सामंत म्हणाले, चिपळूण पालिकेच्या निवडणूकीसाठी शिवसेना भाजपची युती झाली. मात्र महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिलेला नाही. नगरसेवकपदासाठी जिथे उमेदवार आहेत. तेथे मैत्रिपुर्ण लढ होइल. मात्र नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांनी स्थांनिक आमदार निकम यांची भेट घ्यायला हवी. त्यांची चिपळूणात निर्णायक ताकद आहे. आपणही निकमांची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार आहोत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २९ ला चिपळूणात
शिवसेनेने चिपळूण पालिकेची निवडणूक फार प्रतिष्ठेची केलेली आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष येथे विराजमान झालेला नाही. त्यामुळे चिपळूणवर युतीने मोठा फोकस ठेवला आहे. नेटाने काम करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काही दिवसांपुर्वी न बोलता संबंधीतांना दम दिला आहे. तर चिपळूणात शिवसेनेची लाट पसरण्यासाठी २९ रोजी उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्याच्या ठिकाणी ते भेटी देणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.









