आ. राजन साळवींना मोठा धक्का; खंदे समर्थक दीपक नागले शिंदे गटात

उबाठाला खिंडार: किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत केला शेकडो सहकार्‍यांसोबत प्रवेश

रत्नागिरी:- उबाठाचे उपनेते आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे खास समर्थक असलेले जि.प.चे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी आपल्या सहकार्‍यांसह शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला. किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत जवळपास सातशे ते आठशे लोकांनी प्रवेश केल्याने, साळवी यांना राजापूरमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.

जि.प.चे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांना आडीवरे जि.प. गटातून मोठा पाठींबा असून, त्यांनी मतदार संघातील रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत व सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला. यात त्यांच्यासोबत राजापूर तालुक्यातील मोगरे गावाच्या सरपंच सौ. वर्षा थारळी, उपसरपंच राजाराम नाचणेकर, माजी सरपंच वामन साखरकर, शाखाप्रमुख अनिल बावकर, मोगरे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष काशिनाथ सातोपे, उपाध्यक्ष पर्शुराम शेमणकर, सचिव चंद्रकांत साखरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. कोंडसर बु. येथील माजी पं.स. उपसभापती सुहास वारिक यांच्यासह शाखाप्रमुख, गटप्रमुख, युवाशाखाधिकारी, महिला संघटक, बुथ प्रमुख, वाडीप्रमुख, माजी सरपंच्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर कशेळी गावातील कुणबी बँकेचे संचालक विद्याधर गोठणकर, कुणबी समाज सेवा संघाचे सचिव संदीप राड्ये, ग्रामपंचायत सदस्य अजय सुतार, संतोष प्रभू यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आडीवरे जिल्हा परिषद गटामध्ये उबाठाचे आमदार राजन साळवी यांचे वर्चस्व असून, साळवी यांचे खंदे समर्थक म्हणून दीपक नागले व अन्य पदाधिकार्‍यांना ओळखले जाते. माजी शिक्षण सभापती म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. नागले यांच्या शिवसेना शिंदेगटातील प्रवेशामुळे साळवी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

पालकमंत्री उदय सामंत व सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत यांनी मागील काही महिन्यांपासून राजापूर-लांजा तालुक्याच्या विकासासाठी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या कामावर विश्वास ठेवत उबाठातील अनेक पदाधिकारी पक्ष प्रवेश करीत आहेत. विकासात्मक कार्याला प्राधान्य देत दीपक नागले यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कार्यालयात शनिवारी पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, राजापूरचे तालुकाप्रमुख अश्पाक हाजू, रत्नागिरी तालुकाप्रमुख महेश म्हाप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यासर्वांनीच दीपक नागले व त्यांच्या सहकार्‍यांचे घोषणांनी जोरदार स्वागत केले.

भावनिकतेपेक्षा विकासाला महत्व: दीपक नागले

पक्षप्रवेशानंतर दीपक नागले यांनी सांगितले की, भावनिकतेपेक्षा आपण विकासाला प्राधान्य दिले. पालकमंत्री उदय सामंत व किरणभैय्या सामंत यांनी ग्रामीण भागातील विकास कामांना प्राधान्य दिले आहे. विकासाबरोबरच शिक्षण आणि आरोग्याची कामांना प्राधान्य मिळेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.