आ. उदय सामंत यांच्या आजच्या दौऱ्याकडे राजकीय नजरा; मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी 

रत्नागिरी:- मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यापासून मुंबई मुक्कामी असलेले रत्नागिरी विधानसभेचे आमदार, माजी मंत्री श्री.उदय सामंत आज दि. १५ जुलै रोजी मतदार संघाच्या दौऱ्यावर येत आहेत. बंड केल्यानंतर आ.सामंत प्रथमच मतदार संघात येत असल्याने आजच्या दौऱ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

तर दुसरीकडे शिवसेनेच्या जाहिर मेळाव्यात आ.सामंत यांच्यावर शिवसेना नेत्यांनी बोचरी टिका केली होती. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे कोण कोण पदाधिकारी आ.सामंत यांच्या स्वागतासह भेटीसाठी जातात याकडे मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणूकीनंतर शिवसेनेतील आमदारांनी विद्यमान मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत वेगळा गट स्थापन केला होता. अखेरच्या क्षणी रत्नागिरीचे तत्कालीन मंत्री तथा आमदार उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यामुळे मतदार संघात खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यात ना.शिंदे गट व भाजपाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार केले होते. त्यानंतर शिवसेना नेते अधिक आक्रमक झाले होते.

 रत्नागिरी विधान सभा मतदार संघातील शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी आ.सामंत यांच्यावर बोचरी टिका केली होती. त्यानंतर आ.सामंत यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून खा.राऊत यांच्यावर कोणतीही टिका न करता आपली सावध भूमिका मांडली होती. अशातच आज शुक्रवारी आ.सामंत बंडा नंतर प्रथमच मतदार संघात येत असल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

आ.सामंत यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या अधिकृत दौऱ्यात आ.सामंत हे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा व तीन जिल्हा परिषद गटातील विकास कामांच्या आढाव्यासाठी मतदार संघात येत आहेत. तर ते मेळाव्यातील कोणत्याही टिकेला उत्तर देणार नाहीत. तर कोणत्याही सेना नेत्यावर टिका करणार नसल्याचे स्पष्ट  करण्यात आले आहे. मात्र दुपारी १२ वाजता आ.सामंत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहे. त्यावेळी ते कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.