१९ ठिकाणी तपासणी नाके;३४ अधिकार्यांसह पोलीस,होमगार्ड तैनात
रत्नागिरी:- राज्यात आज आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व धर्मांचे सण व उत्सव सलोख्याच्या वातावरणात साजरे करण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर ३४ पोलीस अधिकार्यांसह ३०० पोलीस कर्मचारी, ३५० होमगार्ड, आरसीपी दोन तुकड्या, शिघ्र कृती दलाची एक तुकडी यांच्यासह १९ तपासणी नाके तयार करण्यात आले आहे. आज सकाळपासून बंदोबस्तांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व धर्मियांनी आपआपले सण शांततेस व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये शांतता व जातीय सलोखा सदैव अबाधित राखण्याकरीता, जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस ठाणे स्तरावर मोहल्ला समिती, शांतता समिती, गावातील सर्व धर्मांचे प्रमुख व्यक्ति, समाजातील मान्यवर व्यक्ति तसेच ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये, गोवंश प्राणी (बैल, गाय) यांची अवैध वाहतूक होणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश व व्हिडीओ प्रसारित केल्यास रत्नागिरी पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येणार. रत्नागिरी पोलीस दलातर्फे जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणे स्तरावर, जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी, विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे.
आज साजरा होणारा आषाढी एकादशी व बकरी ईद यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे ३४ पोलीस अधिकार्यांसह ३०० पोलीस कर्मचारी, ३५० होमगार्ड, आरसीपी दोन तुकड्या, शिघ्र कृती दलाची एक तुकडी यांच्यासह १९ तपासणी नाके तयार करण्यात आले आहे.
सलोख्याने सण साजरे करा: धनंजय कुलकर्णी
जिल्ह्यातील नागरिकांनी आपले सण, उत्सव हे इतरांच्या प्रथा परंपरा ह्याचा आदर करून कोणत्याही भावना न दुखावता सलोख्याच्या वातावरणात व बंधु भावाने नेहमी प्रमणे साजरे करावेत असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.