आवाज दाबण्यासाठी खालच्या पातळीवरील राजकारण

खासदार सुनील तटकरे ; मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता

रत्नागिरी:- राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे सरकारचे काम आहे. आज बहुमतात असतानाही राज्य सरकारच्या मनात अस्थिरतेची भावना पाहायला मिळत आहे. एखाद्याचा आवाज दाबण्यासाठी खालच्या पातळीवरील राजकारण सुरू झाले आहे, गळचेपी केली जात आहे. त्यामुळे भविष्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असे ठाम मत राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, आमदार जितेंद्र आव्हाड हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांच्याबाबत दाखल केलेला गुन्हा हा निषेधार्ह आहे. एखाद्या सक्षम नेत्याबाबत असे करणे म्हणजे सरकारच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एखाद्याचा आवाज दाबण्यासाठी खालच्या पातळीवरील राजकारण सुरू झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाला संविधान दिले आहे; मात्र या ठिकाणी गळचेपी केली जात आहे. सत्तेचा अमरपट्टा कायमस्वरूपी कुणाला मिळालेला नाही, हेही सरकारने लक्षात घ्यायला हवे. आव्हाड यांच्याबाबत जो प्रकार घडला त्या वेळी मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. ते असताना झालेली ही कारवाई चुकीची आहे. आव्हाड यांच्याबाबत एक न्याय आणि सत्तेतील मंत्री अब्दुल सत्तार एका महिला खासदाराला अत्यंत खालच्या पातळीवर टीकाटिपण्णी करतो, त्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत. मंत्री सत्तार यांच्यावरही कारवाई केली पाहिजे. आव्हाड यांच्याविरोधात सुडाचे राजकारण केले जात आहे. सध्याचे सरकार विचारांशी लढा देताना दिसत नाही. उलट बहुमताचे सरकार असतानाही त्यांच्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेली मध्यवर्ती निवडणुकांची भूमिका त्यामुळे चुकीची वाटणार नाही. मध्यवर्ती निवडणुका होऊ शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मागील तीन वर्षात महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले आहे. भविष्यातही महाविकास आघाडी एकत्र काम करेल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भाजपने पप्पू म्हणून हिणवले; परंतु त्याच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य जनता त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरली आहे. 21व्या शतकातील ही पहिली मोठी पदयात्रा ठरली आहे. या यात्रेत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसह शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरेंचा सहभागही झाले. भविष्यात नक्कीच एकत्र राहू हेच जणू त्यांनी दर्शवत असल्याचे मत खासदार तटकरे यांनी व्यक्त केले.