मिलिंद किर यांचा दावा; नलावडे जागा मालकच नाहीत
रत्नागिरी:- पालिकेने आलिमवाडी येथील 3.88 गुंठे जमीन खरेदी करण्यावरच मिलिंद कीर यांनी कायदेशीर आक्षेप घेतला आहे. मनीष नलावडे यांच्याकडून पालिकेने ही जागा खरेदी केली. मात्र नलावडे यांनी त्याआधी ही जमिन घेताना केलेले खरेदीखत बेकायदेशीर आहे, असा दावा कीर यांनी जिल्हाधिकार्यांकडे सुनावनी दरम्यान केला.
खरेदीखत बेकायदेशीर असल्याने मनीष नलावडे हे त्या जागेचे मालक नाहीत. त्याच्याकडुन पालिकेने जागा खरेदी करणे हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. सुनावणी दरम्यान जिल्हाधिकार्यांकडे मांडलेल्या म्हणण्याबाबत कीर यांनी पत्रकारांना माहिती दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दोन महिन्यांपूर्वी साठवण टाक्या बसत आहेत, असा अहवाल पालिकेला दिला आहे. आलिमवाडीची जागा निश्चित केल्यानंतर तेथून 9,000 मीटर पाईपलाईन नव्याने टाकण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये अतिरिक्त खर्च होणार आहे. दोन्ही टाक्यांसाठी शासकीय व पालिकेची जमीन उपलब्ध होत असताना परटवणे आलिमवाडी येथील 1 कोटी 27 लाख एवढ्या चढ्या दराची जमीन खरेदी करणे हे नुकसानकारक आहे. एकूण खर्च 4 कोटी 27 लाखाच्यावर जात आहे. यात पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. 26 नोव्हेंबरच्या सभेत जमिनीच्या मूल्यांकनाला मान्यतेसाठीचा ठराव बहुमताने मंजूर करून दुसर्या दिवशी धनादेश देण्यात आला आहे. ही कार्यवाही करण्याची एवढी घाई का?
मनीष चंद्रकांत नलावडे यांच्या नावे 30 मार्च 2019 ला खरेदीखत झाले. ते खरेदीखत चुकीचे आहे, त्यामध्ये एकूण सर्च रिपोर्ट नाही, वारस तपास दिसून येत नाही. वारसांची कुलमुखत्यारपत्र दिसून येत नाहीत, वारसांनी त्याच्या कुलमुखत्यार पत्रामध्ये नेमलेले मुखत्यार अशोक विठ्ठर आयरे यांना गरज भासल्यास पुढे दुसरे मुखत्यार नेमण्याचे हक्क दिलेत की नाहीत याची कोणतीही माहिती नाही. अशोक आयरे यांनी नेमलेल्या मुखत्यार यांना जमीन विक्री अथवा ती विकसित करण्याचे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. संदीप अशोक आयरे यांला इतर वारस यांच्यावतीने सह्या करण्याचे अधिकार नाहीत, सात-बारा व इतर वारसांची नावे नाहीत. ती नसल्याची कोणतीही कारणे दाखवलेली नाहीत. मनीष नलावडे यांना जमिनीचा मालकी हक्क नाही. त्यामुळे त्यांचे खरेदीखत बेकायदेशीर आहे व त्यास आता कायदेशीरता आणता येणार नाही. या शिवाय संदीप आयरे यांच्या घोषणापत्रावर सह्या नाहीत. दुय्यम निबंधक यांच्या देखील सह्या नाहीत.









