शहरवासीयांवर साडेचार कोटींचा भुर्दंड-निलेश भोसले
रत्नागिरी:- आलिमवाडी येथील 3.88 गुंठे जागेसाठी 1 कोटी 27 लाख, 9 किमी पाइपलाइनसाठी 3 कोटी, असे 4 कोटी 27 लाख पालिका खर्च करणार आहे. तो नागरिकांच्या टॅक्समधून आणि नाहक खर्च आहे. चुकीच्या गोष्टी घडत असतील तर एक सुजाण नागरिक म्हणून त्या थांबवणे माझे कर्तव्य आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. लवकरच ती बोर्डावर येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी दिली. राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये उपस्थित होते.
ते म्हणाले, पालिके पुढे पाण्याच्या टाकीसाठी दोन शासकीय जागांचा पर्याय होता. तरी त्याचा विचार न करता एवढी महागडी आणि पालिकेला आर्थिकदृष्ट्या तोट्यात टाकणारा हा व्यवहार आहे. घाई-घाईत झालेला हा व्यवहार संशयास्पद आहे. म्हणून कालच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याबाबत घडलेल्या सर्व प्रकार आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे. त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. पक्षाच्या कानावर हा विषय घातला असला तरी रत्नागिरीचा नागरिक म्हणून ही जनहित याचिका दाखल केली आहे.
जिल्हाधिकारी याला जबाबदारः कुमार शेट्ये आर्थिक फायद्याच्यादृष्टीने पालिका आणि काही यंत्रणा मिळून हा व्यवहार करीत असल्याचे कोणतेही शेमडे पोल सांगेल, मी सांगण्याची गरज नाही. ही प्रथा पडु नये, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. जागा मिळविण्याचे दुसरे मार्गही आहेत. सार्वजनिक कामासाठी ती जागा संपादित करता आली असती. फिनोलेक्स कंपनीकडून घेता आली असती. जिल्हा प्रशासनानेही पालिकेला याबाबत सांगण्याची गरज होती. तरीही हा व्यवहार झाला. त्यामुळे याला जिल्हाधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी केला.









