आरोग्य मंदिर येथील अपघात प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर येथे सोमवारी दुचाकी आणि डंपरचा अपघात झाला. यामध्ये एक महिला जखमी झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघात प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोग्य मंदिर बस स्टॉप येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शुभदा विजय सुर्वे (३०, रा. भंडारपुळे-भंडारवाडी, रत्नागिरी) या दुचाकी (क्र. एमएच-०८अेई २७४८) सोबत अश्वीनी प्रथमेश बोरकर (३१) हीला पाठीमागे बसवून साळवी स्टॉप ते मारुती मंदिर रस्त्याने जात असताना आरोग्य मंदिर बस स्टॉपवर एसटी (क्र. एमएच-२० बीएल १४८८) प्रवाश्यांसाठी थांबली होती. त्यावेळी शुभदा या उजव्या बाजून दुचाकी घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या डंपर चालक उपेंद्र रामभजन सिंह (वय २९, रा. डाली. जि. प्लामु राज्य झारखंड) याने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या अश्विनी बोरकर यांच्या उजव्या पायाला व ढोपराजवळ दुखापत झाली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी शुभदा सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम करत आहेत.