जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्याकडून पाच कोटी निधीची मागणी
रत्नागिरी:- जिल्हा परिषद इमारत विजेसाठी सौरउर्जेमुळे स्वयंपूर्ण झालेली असतानाच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीमध्येही सौर पॅनल बसविण्यासाठी किमान पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा प्रस्ताव त्यांनी मांडला असून निधी देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे.
जिल्हा परिषद भवनात सततच्या वीज वापरामुळे विजबिलांवर लाखो रुपयांचा खर्च होतो. त्याला सौर उर्जेचा पर्याय वापरण्यात आला होता. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जा विकास कार्यकमांतर्गंत जिल्हा परिषद इमारतीसाठी 59 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उर्जा विकास कार्यकमातून ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. जिल्हा परिषद इमारतीला वर्षाला सुमारे 2 लाख 19 हजार 832 युनिट वीजेची गरज लागते. तर महिन्याला 11 हजार 500 युनीट वीज लागते. त्याचे बिल महिन्याला सरासरी दीड लाख रुपयांपर्यंत येते. या सौर यंत्रणेमुळे वीज बिलाच्या सुमारे 30 लाख 24 हजार रुपयांची बचतीस हातभार लागला आहे. शासनाने सौर ऊर्जा निर्मितीला पाधान्य दिले आहे. जिल्हा परिषदेला सौरपॅनेलमधून 3 ते 4 हजार युनीट वीज अधिक मिळते. त्यामुळे वर्षाचे सुमारे पंधरा लाख रुपयांची बचत होत आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींमधील विज बिलांचा प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष वेधण्यात आला आहे. त्यासाठी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सौर ऊर्जेचा प्रस्ताव ठेवला आहे. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उप केंद्रे या ठिकाणी छतांवर सौर पॅनल बसविण्याबाबत प्रस्ताव सुचविला आहे. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विजेचा वापर कमी करण्यासाठी सौर पॅनेल बसवून सौर ऊर्जेचा वापर केल्यास विज बिले कमी रक्कमेची येण्यास मदत होईल. हा आर्थिक ताण जिल्हा परिषदेला कमी होऊ शकतो.
जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सौर यंत्रणा विविध ठिकाणी लावण्यात येऊ शकते. यामुळे विजबिलांची बचत होणार आहे.
– विक्रांत जाधव, अध्यक्ष