रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोवेस्टची विल्हेवाटी संदर्भात नियोजन करण्याबाबत आरोग्य समितीमध्ये चर्चा झाली. बायोवेस्ट एकत्र करण्यासाठी येणारा खर्च कसा परवडेल याबाबत अभ्यास करा अशा सुचना आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
म्हाप यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची सभा झाली. यावेळी सर्व सदस्य आणि जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेमध्ये विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली. जिल्ह्यात 67 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या ठिकाणी येणार्या रुग्णांवर उपचार केले जातात. त्यातून निर्माण होणारा वैद्यकीय कचर्याचे निमुर्लन त्या-त्या पातळीवर केले जाते. गावागावात वसलेल्या या आरोग्य केंद्रांकडील बायोवेस्ट एकत्रित करणे खर्चिक असून वेळखाऊ आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या निकषानुसार योग्य पध्दतीने त्यांची विल्हेवाट लावण्यात येते. शहरातील विविध रुग्णालयातील वैद्यकीय कचरा एकत्र करुन त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी खासगी संस्था काम करतात. या पध्दतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कचर्याबाबत नियोजन करता येते का यावर आरोग्य समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. त्यासाठी येणारा खर्च, गोळा करण्याचे नियोजन याबाबत अभ्यास करावा अशा सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत. एखादी संस्था स्वतःहून तयार झाली तर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येईल अशा सुचना श्री. म्हाप यांनी दिल्या आहेत.