आरे वारे समुद्रात 4 चार पर्यटकांचा बुडून मृत्यू, रत्नागिरीतील दोघांचा समावेश

रत्नागिरी ओसवालनगर येथील कुटुंबावर काळाचा घाला

रत्नागिरी:- रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आरे वारे  समुद्रात बुडालेले चारही पर्यटक रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बुडालेल्या चार पर्यटकांपैकी तीन पर्यटक महिला तर एक पुरुष आहे. 

रत्नागिरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी आरे वारे समुद्र किनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. 

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओसवाल नगर येथून आरे वारे समुद्र येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक बुडाल्याची घटना घडली. या चार जणांमध्ये जुनेद बशीर काझी (वय- ३० ओसवाल नगर), जैनब जुनेद काझी (वय- २८ ओसवाल नगर) उजमा समशुद्दीन शेख (वय-१७ मुंबई मुंब्रा) उमेरा शमशुद्धीन शेख (वय- १६ मुंब्रा) बुडालेल्या चार पर्यटकांपैकी दोन पर्यटक हे नुकतेच मुंबई येथून आले होते. समुद्रात उरलेल्या नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण पाण्यात बुडाले. अवघ्या काही मिनिटांत चारही जण खोल समुद्रात बुडाल्याने चारही जणांचा बुडून मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती स्थानिक पोलिस पाटील आदेश कदम यांनी ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना माहिती दिली. मोठ्या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्री बघते यांनी घटनास्थळाला भेट दिली. चारही पर्यटकांना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात  हलवण्यात आले.