रत्नागिरी:- ज्यांनी झिपलाईनसाठी तुम्हाला परवानगी मिळवून दिली, त्या व्यक्तीला इथे बोलावून त्यांचे केलेले आदरातिथ्य हीच खरी कोकणी संस्कृती आहे. ती रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सने जपली हेच महत्त्वाचे आहे, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कौतुक केले.
आरे-वारे येथील ओशन फ्लाय झिपलाईन या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रधान सचिव विकास चंद्ररस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महेश म्हाप, रूफिक पटेल, राजू भाटलेकर, नित्यानंद भुते, दिनेश जैन, विरेंद्र वणजू, रोशन फाळके व अन्य मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, कोणाला माहीत नव्हती अशी ठिकाणी निवडून त्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार्यांमध्ये रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा विद्यमान प्रधान सचिव विकास चंद्ररस्तोगी यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. ज्यांनी तुम्हाला परवानगी मिळवून दिली त्या व्यक्तीला तुम्ही इथे बोलावलेत तुम्ही एक पायंडा निर्माण केला जो आपल्याला मदत करतो, त्याचे आदरातिथ्य करणे ही कोकणी संस्कृती आहे. ती तुम्ही जपली असल्यामुळे रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे कौतुक करावे तेवढे थोडेच. रत्नागिरीत जीवाला जीव देऊन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळेचे नागरिक सुरक्षित आहेत. चिपळूणात आलेल्या महापूरात लोकांना सर्वप्रथम वाचवण्याचे काम कोणी केले असेल तर ते विरेंद्र वणजू व त्यांच्या टिमने केले. तुम्ही माणसं जगवण्याचे काम करताय आणि माणसं जगवत असताना स्वत:चा जीव धोक्यात घालत आहात. हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तुमच्या मागे राजकीय ताकद उभी करणे हे काम आमचेच आहे.