आरटीओमधील नवीन परवान्याचे काम १२ दिवस ठप्प

सारथीच्या सर्व्हरमध्ये दोष; सोमवारपासून काम पूर्वपदावर

    रत्नागिरी:- गेल्या १२ दिवसांपासून ‘सारथी’च्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) संपूर्ण यंत्रणा ठप्प होती. एकही वाहन परवाना देण्यात आला नाही. यंत्रणेतील दोष दूर झाल्याने नुकताच सारथीचा हा सर्व्हर सुरू झाला. गेल्या दहा दिवसात लर्निग परवाने सुमारे १२०० आणि परमनंट सुमारे १२०० वाहन परवाने रखडले होते; मात्र सर्व्हर सुरू झाल्याने चार दिवसात ७०६ परवाने देण्यात आले. आता यंत्रणा पूर्वपदावर आल्याचे आरटीओ प्रशासनाने सांगितले.

    केंद्र शासनाच्या सारथी या संकेतस्थळाच्या सर्व्हरमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्यामुळे देशातील वाहन परवाने देण्याची प्रक्रिया गेल्या १२ दिवसांपासून ठप्प झाली होती. ‘सारथी’वर आत्तापर्यंत काढण्यात आलेल्या सुमारे २५ कोटी वाहनधारकांच्या वाहन परवान्याची माहिती गहाळ झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता; परंतु नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) युद्धपातळीवर काम करून तो ‘डाटा’ मिळवला आहे. त्यामुळे सोमवारपासून ‘सारथी’ची यंत्रणा पूर्ववत करण्यात आली आहे. सोमवारपासून आजपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ७०६ वाहन परवानाचे काम झाले आहे. जिल्ह्यात आरटीओ कार्यालयाकडून महिन्याला सुमारे ३ हजार शिकाऊ परवाने आणि ३ हजार कायम परवाने दिले जातात.

    अनेक वाहनधारकांच्या शिकाऊ परवान्याची मुदत एक फेब्रुवारीला संपली. त्या दिवसापासून यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे वाहनधारकांना विहित मुदतीत कायमस्वरूपाचा परवाना काढता आला नाही. त्यामुळे परिवहन विभागाने वाहन परवानाची मुदत वाढवून दिली असून, २९ फेब्रुवारीपर्यंत त्यांना कायमस्वरूपाचा परवाना काढता येणार आहे. परिवहन विभागाने हा निर्णय घेतल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.