रत्नागिरी:-शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्यासाठी आणखी कालावधी मिळाला आहे.
या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत ५७ हजार ९९ प्रवेश निश्चित झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन सोडत ३० मार्च रोजी काढण्यात आली.
या सोडतीनुसार प्रवेशाच्या पोर्टलवर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ४ एप्रिल रोजी घोषित केली. त्यात ९० हजार ६८८ विद्यार्थ्यांची निवड यादी तसेच ६९ हजार ८५९ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. तसेच या प्रवेश प्रक्रियेत २०० दिव्यांग विद्याथ्यांची निवड झाली आहे. निवड आणि प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी सुरवातीला २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती, त्यानंतर २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. निवड यादीतील विद्याथ्यांच्या प्रवेशासाठी ही अंतिम मुदतवाढ असणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.