आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी:- बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण अधिकाराच्या (आरटीई) नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्यात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी पालकांना उद्या 9 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

आरटीईअंतर्गत पहिलीसाठी मोफत प्रवेश मिळण्यासाठी जिल्ह्यातून 935 अर्ज ऑनलाईन प्रणालीने दाखल करण्यात आले होते. यात ऑनलाईन लॉटरी प्रणालीने 609 विद्यार्थ्यांची निवड प्रवेशाकरिता करण्यात आली होती. लॉटरी प्रणालीने प्रवेशाकरिता पात्र ठरलेल्या पालकांना निवड झालेल्या शाळेत प्रत्यक्षात प्रवेश देण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. उर्वरित विद्याथ्यांना कागदपत्रांची पडताळणी करुन शालेय स्तरावर प्रत्यक्षात ऑनलाईन प्रणालीने प्रवेश निश्चित करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली गेली आहे. राज्यातील गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राप्त होणार्‍या ओटीपीत तांत्रिक अडचणी दिसून येत आहेत. त्यामुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात अनेक अडचणी निर्माण होत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाचे पुणे विभागीय शिक्षण संचालक डी.जी. जगताप यांनी बुधवारी ऑनलाईन प्रणालीच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात येत असल्याचे लेखी आदेश शिक्षण विभागास पाठविले आहेत. निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झाली नाही, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.