आरक्षण असेल तरच मिळणार कोकण रेल्वेत प्रवेश

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. उद्यापासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरु होईल; मात्र ज्या प्रवाशांकडे आरक्षण आहे, त्याच प्रवाशांनी रेल्वे स्थानकात यावे. आरक्षण नसलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही असा कोकण रेल्वे प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने नियमही शिथिल केले. परिणामी यंदाचा गणेशोत्सव गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी पुर्वीच सुरु केली होती. चाकरमान्यांचा प्रतिसाद पाहून मुंबईतून कोकणात येणार्‍यांसाठी कोकण रेल्वेने यंदा 225 हुन अधिक फेर्‍या सोडल्या आहेत. गणपतींचे आगमन झाले असून हजारो चाकरमानी कोकण रेल्वेने गावात दाखल झाले आहेत. काहींचे गणपती दीड दिवसांचे तर काहींचे पाच दिवसांचे असतात. विसर्जन सुरु झाले की गावाकडे आलेले गणेश भक्त पुन्हा मुंबईकडे परतू लागतात. काही चाकरमानी आगमनावेळी दर्शन घेऊन माघारी परतात. त्यांच्यासाठी कोकण रेल्वेकडून नियोजन झालेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होऊ नये, या करिता कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात प्रवेशद्वारावरच बॅरेगेटिंग करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथे येणार्‍या प्रवाशांची तपासणी केली जाते. त्यांची नोंद करुन त्यांना पुढे पाठविण्यात येते. रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांच्या गर्दीचे नियंत्रण केले जात आहे. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होईल. यावेळी केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांना स्थानकाच्या प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे आरक्षण नाही, अशा मंडळींनी स्थानकावर गर्दी करू नये त्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. आरक्षण असलेल्या मंडळीनाही तपासणी करीता गाडीच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.