आरक्षणासह जातनिहाय गणनेसाठी ओबींसींचा एल्गार

रत्नागिरीत बैठक; वाडी-वस्तीवर जाऊन मांडणार प्रश्‍न

रत्नागिरी:- राजकीय आरक्षण आणि जातनिहाय जनगणना हे मुद्दे घेऊन वाडी-वस्तीवरील ओबीसींच्या जागृतीसाठी एल्गार पुकारण्याचा निर्णय रत्नागिरीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत झाला. यावेळी 21 जणांची तालुका कार्यकारीणीवर शिक्कामोर्तब झाला.

रत्नागिरीतील ओबीसी समाजाची सभा कुणबी भवन येथे झाली. यावेळी रघुवीर शेलार, रुपेंद्र शिवलकर, अनिल पोटफोडे, राजन कापडी, सौ. स्नेहा चव्हाण, संजय बैकर, शिवाजी बोटके, सुरेंद्र घुडे, हारीस शेखासन, सुशांत चवंडे, अ‍ॅड. मांडवकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या सर्व निकषांचे पालन करत सर्व सदस्यांनी आपापली मते मांडत सध्या सुरु असलेल्या गोंधळाबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली.

मंडळ आयोगातील तरतूदींमध्ये कोणत्या गोष्टींवर आरक्षण मिळाले याबाबत शिवाजी बोटके यांनी उपस्थितांना माहिती दिली. राजीव कीर यांनी ओबीसी प्रवर्गातील जातींना संविधानात्मक कशी ओळख मिळाली याबाबत काही मुद्दे मांडताना त्याला धक्का दिला जात असल्याचे सांगितले. ओबीसी आरक्षणामुळे अनेक ठिकाणी सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदस्तरावर काम करण्याची संधी ओबीसी समाजातील कतृत्त्ववान लोकांना मिळत आहे. तेच आरक्षण धोक्यात आले असून त्यावर काम करण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी मत मांडले. ओबीसींच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली. सध्याच्या निर्णयांमुळे होणार्‍या तोट्यांची माहीती तळागाळात पोचवण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी समाज संघटनेमार्फत प्रचार-प्रसार मोहीम काढण्यावर सर्वांचे एकमत झाले. प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन हे प्रश्न समाजापुढे मांडले जातील. जिल्ह्यात कुणबी समाजाची संख्या अधिक आहे. भविष्यात आरक्षण राहीले नाही, तर अनेक ओबीसींना प्रतिनिधीत्व करण्याची संधीच मिळणार नसल्याचे मत यावेळी उपस्थित करण्यात आले. येत्या काही महिन्यात होणारी जनगणना जातनिहाय करावी अशी मागणी केली जाणार आहे. त्याचे फायदा काय आहेत, हे लोकांना सांगण्यात येणार आहे. दबाव गट तयार करुन या मागण्या मान्य करणे शक्य आहे. त्यासाठी गावागावात जाऊन एल्गार करण्याचा निर्णय झाला. पुढील रविवारी पुन्हा बैठक होणार असून गावनिहाय बैठकांचे नियोजन कसे करायचे यावर चर्चा केली जाणार आहे. तसचे 21 जणांच्या कार्यकारीणीलाही मंजूरी दिली जाणार आहे.

या बैठकीत नंदकुमार मोहिते यांनी उपस्थित स्वागत केले तर राजीव किर यांनी प्रास्तविक केले. यावेळी भगवानशेठ सुतार, सुभाष लांजेकर, प्रविण रुमडे , मधुकर नागवेकर यांच्यासह अनेकजणं उपस्थित होते.