अनेकांना दिलासा, मातब्बरांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्न
रत्नागिरी:- जिल्हा परिषद 56 गटाचे आरक्षण सोडत जाहीर झाले. यामध्ये काही दिग्गजांना फटका बसला आहे तर काहींना मात्र लॉटरी लागली आहे. जिल्हा परिषदेचे 56 पैकी 28 गट महिला आरक्षित झाले आहेत. विक्रांत जाधव, रोहन बने, संतोष थेराडे, सहदेव बेटकर, रचना महाडिक, स्वरूपा साळवी, नेत्रा ठाकूर या मातब्बर नेत्यांना लॉटरी लागली आहे. तर आण्णा कदम, विनोद झगडे, बाबू म्हाप, बाबू पाटील यांना मात्र फटका बसला आहे. या चौघांना आता दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे.
या आरक्षणामुळे अनेक मातब्बर नेत्यांना फटका बसला आहे. यामध्ये रामदास कदम यांचे बंधू व माजी बांधकाम सभापती आण्णा कदम यांचा समावेश आहे. त्यांचा भडगाव हा गट आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना आता दुसरा मतदार संघ शोधावा लागणार आहे. खेडमध्ये फक्त दयाळ हाच गट फक्त सर्वसाधारणसाठी राखीव आहे. चिपळूणमध्ये माजी जि.प. बांधकाम सभापती विनोद झगडे यांना फटका बसला आहे. त्यांचा गट आरक्षित झाला आहे. त्यांनासुद्धा दुसरा गट शोधावा लागणार आहे. रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व माजी जि.प. बांधकाम सभापती बाबू म्हाप यांचा शिरगाव हा गट आरक्षित झाला आहे. त्यांनासुद्धा दुसर्या गटाचा आधार घ्यावा लागणार आहे. या तीन तरी मातब्बरांना या आरक्षणाचा फटका बसला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील मातब्बरांना मात्र त्यांच्या मनासारखेच आरक्षण पडले आहे. यामध्ये माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांचा कोसुंब गट हा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांचा कडवई, शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांचा धामापूरतर्फे संगमेश्वर, शिक्षण सभापती विलास चाळके यांचा दाभोळे हे गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत. तर माजी जि.प. अध्यक्ष रचना महाडिक यांचा कसबा हा सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित झाला आहे. माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचासुद्धा असगोली हा गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. तसेच जि.प. माजी सदस्य नेत्रा ठाकूर यांचा वेळणेश्वर हा गट सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाला आहे.
रत्नागिरीमध्ये नाचणे हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाला आहे. याचा फायदा माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांना होणार आहे. त्याचबरोबर भाजपचे सतिश शेवडे यांचा कोतवडे हा गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. माजी उपाध्यक्ष उदय बने यांना मात्र त्यांचा जुना मतदार संघ असलेला गोळपचा आधार घ्यावा लागणार आहे. लांजामध्ये स्वरुपा साळवी यांचा गवाणे गट हा सर्वसाधारणसाठी राखीव झाला आहे.