आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; तीन तरुण गंभीर जखमी

चिखलगाव येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल

दापोली:- दापोली ते दाभोळ मार्गावरील चिखलगाव येथे आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या ॲक्टिव्हा दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास ‘सृष्टी हॉलिडे रिसॉर्ट’समोर हा अपघात घडला. याप्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक सचिन गजानन गुरव (रा. लाडघर) हा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. MH 12 SX 9529) घेऊन दापोलीकडून दाभोळच्या दिशेने जात होता. चिखलगाव येथील सृष्टी रिसॉर्टसमोर त्याने आपला टेम्पो रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवला. यावेळी समोरून दाभोळकडून दापोलीकडे येणाऱ्या ॲक्टिव्हा दुचाकीला (क्र. MH 01 EH 3060) टेम्पोने जोराची धडक दिली.

​या भीषण अपघातात दुचाकीवरील आर्यन संदीप सोलकर, सौरभ सतीश सोलकर, सागर संदीप जाधव (सर्व रा. मळे खालची वाडी, ता. दापोली) गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

​या अपघाताबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश दौलत कादवडकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी चालक सचिन गुरव याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (ख) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​दाभोळ सागरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.