रत्नागिरी:- त्वरित नोकरीच्या संधीमुळे आयटीआय प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. आता शासनाने त्यातच आयटीआयच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या विद्या वेतनामध्ये भरीव वाढ केली असून, आता या विद्यार्थ्यांना 40 ऐवजी 500 रुपये प्रतिमहिना विद्यावेतन मिळणार आहे. कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी हातभार लागणार आहे.
जिल्ह्यात शासकीय तसेच खासगी संस्था असून यामध्ये दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थी क्षमता आहे. यामध्ये विविध कौशल्य अभ्यासक्रम शिकवले जातात. अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक तसेच आठ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक मागास घटकातील आयटीआय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. यापूर्वी 40 रुपये प्रतिमहिना विद्यावेतन दिले जात होते. मात्र, वाढत्या महागाईचा फटका शैक्षणिक साहित्यालाही बसत असल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक चणचण भासत होती. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाकडून आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन दरमहा 500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागणार असून, त्या अर्जांची छाननी करुन मगच पुढील मंजुरीसाठी हे अर्ज पाठवले जाणार आहेत. त्यासाठी पालकांच्या उत्पन्नाच्या दाखल्यासह आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. विद्यावेतन मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोषागाराकडून पैसे मागणी करुन ते विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.
नुकतेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विद्यावेतनातील वाढीमुळे या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक मदतीचा हातभार लागणार आहे.