रत्नागिरी:- समोर कोसळणारे तोफगोळे, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ, मध्येच होणारा स्फोट, छातीत धडकी भरवणारी बंदुकीच्या गोळ्यांची फायरिंग असा जीवाचा थरकाप उडवणारी कहाणी सांगितलेय ती रत्नागिरी मिरकरवाडा येथील मुस्कान सोलकर हिने. एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या या विद्यार्थिनीने जवळून अनुभवलेला जीवावरचा प्रसंग कथन केला आहे.
मुस्कान सांगत होती, 23 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. थडाडणार्या तोफा, बॉम्ब स्फोट, पत्याप्रमाणे कोसळणार्या इमारती, समोरुन होणारा गोळीबार, सायरनचे आवाज, धुळीचे साम्राज्य, हवेत घिरटया घेणारी विमाने, समोरुन किंवा वरुन होणारा गोळीबार… क्षणार्धात काहीही होवू शकतं. कधीही आपल्या दिशेने गोळी येउ शकते. बॉम्ब फिरकावला जावू शकतो. आपले काय होईल. हे सारं पाहून आम्ही पुरते घाबरलो होतो. विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावर आम्ही राहत होतो. आम्ही 242 जण होतो. मात्र याच दरम्यान आम्हाला एक दिलासा देणारे एक भारतीय व्यक्ती मिळाली. विद्यापीठात रोमानियातील एका भारतीय निवासी उद्योजकाने आमची राहण्याची सोय केली. एका रुममध्ये 4 विद्यार्थी होतो.
आमच्याकडील खाद्यपदार्थ संपले होते. बाहेरुन काही आणणे शक्य नव्हते.त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ आली. घरातून वारंवार फोन चालू होते. एका रुममध्ये 4-4 जण असल्यामुळे एकावेळी दोघांनीच झोपायचे आणि दोघांनी जागे रहायचे. खोलीतील सर्व दिवे घालवण्यात आले होते. अंधारात चाचपड रहावे लागायचे. बाहेर पडावे तर जीव गमवावा लागला असता. दोन दिवस आम्ही कसेबसे काढले. आम्ही यातून कधी बाहेर पडू हे आम्हाला माहितच नव्हते. अखेर आमच्यासाठी चांगला दिवस उजाडला. 25 फेब्रुवारीला भारतीय राजदूतामार्फत आम्हाला रोमानिया सीमारेषेपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे आम्हाला दूरध्वनीवरुन सांगितले. थोडासा जीव भांड्यात पडला.
आम्ही आमच्या बॅग घेवून निघालो. युक्रेनला जाण्यासाठी 3 तास लागले. मात्र रस्त्यात वाहनांची तोबा गर्दी होती. त्यामुळे आम्हाला मध्येच सोडण्यात आले. अंगात त्राण नसतानाही हातात सामानाच्या बॅग सावरत सावरत 8 तास पायी प्रवास करत होतो. रोमानिया सीमेवर आल्यानंतर तेथे तपासणीसाठी पुन्हा 13 तास रांगेत उभे रहावे लागले. अंगात त्राण नाहीत, खायला काहीच नाही. मात्र जीव वाचवणे हा एकच मार्ग होता. हे कमी म्हणून की काय तेवढयात बर्फवृष्टी सुरु झाली. काय करावं काहीच कळत नव्हतं. 1 मार्चला सायंकाळी भारतात जाण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात आली. गर्दी खूप होती. यामध्ये मी व माझ्या एका मित्राचा नंबर लागला. अन्य मैत्रिणी अजून रोमानियालाच आहेत. रात्री 11.35 चे विमान होते. विमानात बसलो, प्रवास सुरु झाला तेव्हा मात्र सुटकेचा निःश्वास टाकला. 14 तासाच्या प्रवासानंतर बुधवारी रात्री 12 वा. आपण आता आपण भारतात सुखरुप पोहोचलो. अखेर तपासणीनंतर महाराष्ट्र सदनमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दिल्लीतून मुंबईला पोहोचण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. रत्नागिरीत येऊन कुटुंबाला भेटल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र युक्रेनमधील ती घटना आठवली की अंगावर अक्षरशः शहारे येतात असे मुस्कानने सांगितले.









