रत्नागिरी:- जिल्ह्यात भविष्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अनुचित प्रकार घडल्यास संपूर्ण यंत्रणा काही मिनिटात मदतीसाठी उभी राहावी, या उद्देशाने जिल्ह्यात घटना प्रतिसाद प्रणाली (आयआरएस) कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी मंत्रालयातील एजन्सी शुक्रवारी रत्नागिरीत दाखल होणार आहे. ही टीम जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना याविषयी प्रशिक्षण देणार आहे. त्याचे नियोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून सुरू आहे. सर्व शासकीय कार्यालयाकडून त्याची माहिती घेण्यात येत आहे.
आयआरएस देखील याच्याशी संबंधित यंत्रणा आहे. जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी कोणती घटना घडल्यास त्याच्या आजुबाजूला कोणकोणते विभाग आहेत, कोणत्या यंत्रणेची त्वरित मदत मिळू शकते याचा आढावा घेऊन प्रत्येक विभागाकडून ही माहिती मागवली जाणार आहे. त्यानंतर आयआरएसकडून हे प्रशिक्षण दिले जाईल. घटना घडताच क्षणी संबंधित यंत्रणांची त्वरित घेतली जाणार आहे. भविष्यात कोणत्याही अनुचित अथवा कोणती दुर्घटना घडली तर काही मिनिटातच यंत्रणा मदतीला उभी राहिली पाहिजे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून त्याचे नियोजन केले जात आहे. सर्व शासकीय कार्यालयांची माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आपत्ती व्यवस्थापनात समन्वय आणि संपर्क या दोन महत्वाच्या बाबी असून त्यामध्ये प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे आपत्ती प्रसंगात प्रत्यक्ष मदतकार्य करणारी अनेक प्राधिकरणे असली तरी त्यांचा एक प्रमुख असायला हवा. त्या प्रमुखाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्य केले जावे, जेणेकरून मदतकार्यात सुसंगतपणा येऊन विहित वेळेत व योग्य मदत मिळून आपत्ती प्रसंगाचे निराकरण लवकरात लवकर होईल. आपत्ती प्रसंगात प्रतिसाद कालावधी सर्वात महत्वाचा आहे. तो कमीत कमी असणे अत्यावश्यक आहे. सर्वात कठीण आपत्तीप्रसंगी उत्तम तयारी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन असे त्याचे महत्व आहे.









