रत्नागिरी:- रत्नागिरीतील सुप्रसिद्ध मॅकेनिक आनंद बंदरकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. सकाळी छातीत दुखू लागल्याने ते डॉक्टरकडे गेले असता त्या ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. मृत्युसमयी आनंद बंदरकर यांचे वय ४९ इतके होते.
अत्यंत उमद्या स्वभावाचा, प्रत्येकाच्या मदतीला धावणारा एक सच्चा मित्र अशी आनंद बंदरकर यांची ओळख होती. आपल्या वडिलांचा मोटार दुरुस्तीचा व्यवसाय त्यांनी पुढे चालवला व मोठ्या प्रमाणात वाढवला. रत्नागिरीतील एमआयडीसी येथे आनंद मोटर्स या नावाने त्यांचे वर्कशॉप होते. श्री रत्नागिरीचा राजा मारुती मंदिर येथील उत्सवात ते आपली सेवा बजावत असत. आपला व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी जुन्या गाड्या ठेवण्याचा देखील छंद जोपासला होता. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांनी आपल्या फियाट गाडीचा ५० वा वाढदिवस देखील साजरा केला होता. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने आणलेल्या वैकुंठ रथाची देखभाल मोफत करण्याची जबाबदारी देखील आनंद बंदरकर यांनी मोठ्या मनाने स्वीकारली होती. अत्यंत उमद्या स्वभावाच्या या व्यक्तिमत्वाचे तरुण वयात झालेल्या निधनाने मित्रपरिवारात शोककळा पसरली. आनंद यांच्या मृत्यूची बातमी समजताच अनेकांनी इस्पितळात धाव घेतली. आनंद यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. रात्री उशिरा दानशूर भागोजीशेठ कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.