रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीजच्या ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा निमुर्लनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शासन निर्णय झाल्यानंतर ग्रामस्थांनी नाणीजमधील सोळा वाड्यांमध्ये बैठका घेतल्या. चर्चा घडवून आणल्या, महिलांशी संवाद साधला, शंकाचे निरसन केले आणि ठरावाची गांभिर्याने अंमलबजावणी करण्याचा निर्धार सर्वांनी केला.
नाणीज येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जाखड यांच्यासह गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, विस्तार अधिकारी पी . एन . सुर्वे, श्रीमती प्राजक्ता शिरधनकर, नाणीजचे सरपंच गौरव संसारे, उपसरपंच सौ. राधिका शिंदे, ग्रामसेवक आशिष खोचरे आणि नऊ सदस्य उपस्थित होते. अडीचशेहून अधिक ग्रामस्थांनी हजेरी लावली. त्यात बहुसंख्य महिलांचाच समावेश होता. सभेच्या सुरुवातीला समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मुलन होणेबाबत . आणि या अनिष्ट प्रथेतून निर्मुलन गाव घोषित करणे या विषयाचे वाचन करण्यात आले. सौ. स्वाती सुनील कांबळे यांनी हा ठराव मांडला आणि सौ . भूमी राकेश सावंत यांनी त्याला अनुमोदन दिले व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याप्रसंगी डॉ. जाखड यांनी सरपंचांसह ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वांचे कौतुकही केले. विधवा प्रथा निमुर्लनासाठी नाणीज ग्रामपंचायतीने जसा पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे जिल्हा भरातील सर्वच ग्रामपंचायतींन पुढे आले पाहीजे. या प्रथा बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहीजे असे आवाहन त्यांनी केले.
याबाबत माहिती देताना सदस्य विनायक शिगवण म्हणाले, 17 मे रोजी विधवा प्रथा निमुर्लनाचा शासन निर्णय आल्यानंतर त्याची नाणीज मध्ये अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीनेही पावले उचलली.