आत्महत्या करायची असती नाशिकमध्येच केली असती रत्नागिरीत का आली असती?

रत्नदुर्ग किल्ल्यावरुन बेपत्ता तरुणीच्या वडिलांचा भावनिक सवाल

रत्नागिरी:- रत्नदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात पडून आत्महत्या केलेल्या तरुणीची अखेर ओळख पटली आहे. तरुणीचे नाव सुखप्रीत धारिवाल असे आहे. मात्र या तरुणीचे नातेवाईक रत्नागिरीत दाखल होताच अनेक प्रश्नांना नव्याने तोंड फुटले आहे. सुखप्रीतचे वडील प्रकाशसिंह कौर यांनी स्वतः रत्नागिरीत येत घटनास्थळाला भेट दिली आणि आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.

सुखप्रीत हिने आत्महत्या केलेल्या घटनास्थळी उभं राहून तिच्या वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करत त्यांनी एकच आर्त सवाल केला. “जर तिला आत्महत्या करायचीच असती, तर ती नाशिकमध्ये केली असती. रत्नागिरीला का आली असती?”

सुखप्रीत ही नाशिकमधील आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होती. तिने काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीत येण्यासाठी नाशिकहून प्रस्थान केलं होतं. तरुणीच्या बॅगेतून पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली असून, त्यामध्ये तिने लिहिलं आहे –
“मी संकटात अडकले आहे. मी कोणाला सांगू शकत नाही. मी काय करू? मला समजत नाही.”

ही चिठ्ठी तिच्या मानसिक अवस्थेची साक्ष देत असली, तरी वडिलांच्या मते, ती कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणारी नव्हती.

“त्या” तरुणावर संशयाची सुई; वडिलांचा थेट आरोप

सुखप्रीतच्या वडिलांनी तिच्या मृत्यूमागे एका विशिष्ट तरुणाचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे.
“हरामखोराने फोन केला. तोच तिला सतत फोन करत होता,” असा संतप्त आरोप त्यांनी केला. त्यांनी नाव घेऊन रत्नागिरीत आयडीबीआय बँकेत कार्यरत असलेल्या जोशन नायक या तरुणावर संशय व्यक्त केला.
“त्याच्यामुळेच माझी लेक रत्नागिरीला आली होती. त्याने प्रेमाचं नाटक केलं, तिच्या भावना फसवल्या आणि अखेर तिचा घात केला,” असा त्यांच्या शब्दांत आक्रोश होता.

सुखप्रीत ही काही काळापूर्वी बेंगळुरू येथील मणिपाल कॉलेजमध्ये बँक प्रशिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची जोशनशी ओळख झाली होती. तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यानुसार, या ओळखीनंतर सुखप्रीत दोन वेळा रत्नागिरीला येऊन जोशनला भेटली होती.

पोलिस तपास सुरू; सत्य शोधण्याची गरज

या प्रकरणातील अनेक बाबी अजूनही अंधारात आहेत. कुटुंबीयांच्या आरोपांनुसार, हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून, त्यामागे भावनिक फसवणूक, दबाव किंवा संभाव्य मानसिक छळ असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, सुखप्रीतच्या कॉल रेकॉर्ड, तिच्या संपर्कातील व्यक्ती, आणि मृत्यूच्या आधीचे हालचाली यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.

प्रेमाच्या नावाखाली झालेली फसवणूक, एका मुलीचा अकाली मृत्यू आणि एका वडिलांचा हतबल प्रश्न  “माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार कोण?” या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.