आठ वर्षांची प्रतीक्षा संपली… तरुणीच्या जिद्दीला उद्योजक किरण सामंत यांच्या मदतीचे बळ

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके गावांतील तरुणी रूपाली आलीम गेल्या ८ वर्षापासून विविध आजारांशी झुंज देत आहे. २०१३ ला मणक्यावर झालेली शस्त्रक्रिया, २०१९ ला उजव्या पायाला झालेले गॅंगरीन आणि त्यामुळे काढावा लागलेला पाय, या भयानक परिस्थितीवर तिने मात केली आहे; मात्र स्वतःच्या पायावर उभे राहाता येत नाही ही खंत तिला होती. आता आठ वर्षानंतर नव्या वर्षात ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकली. तिच्या जगण्याच्या उमेदीला बळ दिलं उद्योजक भैय्या उर्फ किरण सामंत यांनी!

किरण सामंत यांच्या कार्यालयामध्ये आलेल्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून या मुलीला आवश्यक असणाऱ्या कृत्रिम पायाविषयी काही करता येईल का, अशी विचारणा करण्यात आली. तातडीने सामंत यांनी याबाबत आवश्यक ती माहिती घेतली. त्यांच्या कार्यालयातील आरोग्य मित्र फैसल मुल्ला आणि सागर भिंगारे यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपंग पुर्नवसन विभागातील निवृत्त डॉ. राजेंद्र कशाळकर (कृत्रिम अवयव तज्ञ) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या मुलीला आणून उजव्या पायाचे माप घेतले. ही बाब मंजूर करणे आवश्यक होते. भैय्यांनी डॉ.कशाळकर यांच्याशी चर्चा करून मुलीच्या उपचाराचा प्रश्न सोडवला.

तिच्या सर्व व्यंगाचा विचार करून तिच्या सोईचा कृत्रिम पाय डॉ. कशाळकर यांनी बनवला. तो पाय बसवल्यानंतर व्हिलचेअरवर फिरणारी रूपाली ८ वर्षांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्वतःच्या पायावर उभी राहून आत्मविश्वासाने चालू लागली, हे पाहून तिच्या आईसह कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत किरण सामंत यांना धन्यवाद दिले.

अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना भैय्या सामंत त्यांच्याकडे आलेल्या अनेक नागरिकांचे प्रश्न ते मार्गी लावतात. एखाद्याला शब्द दिला की तो हमखास पूर्ण होणार याची खात्री समोरच्या व्यक्तीला मिळते. या मुलीला किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी नवसंजीवनी दिली. फैसल मुल्ला, सागर भिंगारे यांचेल योगदान मोलाचे आहे. ते दोघे सतत पाठपुरावा करत रूपाली व तिच्या कुटुंबाला धीर देत होते.