आठवड्यात धरणातील पाणीसाठ्यात ४.४० टक्के घट

मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन; ३ मध्यम, ४६ लघु प्रकल्प

रत्नागिरी:- वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या धरणांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. गेल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठा ८७.६३ टक्के होता. बाष्पीभवन होऊन या आठवड्यात तो ८३.१९ टक्के झाला आहे म्हणजे जिल्ह्यातील ३ मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि ४६ लघु प्रकल्पांमधील (धरण) पाणीसाठा आठवड्यात ४.४० टक्केने घटला आहे. पारा ३६ अंशावर गेल्याने मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन धरणातील पाणी झपाट्याने घटत आहे. 

जिल्ह्यातील धरणांमध्ये ३६.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाच्या साप्ताहिक अहवालात हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात ३ मध्यम आणि ४६ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. दोन वर्षांपूर्वी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरणक्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडल्याने धरण फुल्ल झाली होती; मात्र गेल्या वर्षी परतीच्या पाऊस पडल्याने धरणातील पाणीसाठा चांगला होता; परंतु यंदा सूर्य कोपल्याने पारा ३४ ते ३६ अंशावर गेला आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे.  
नातूवाडी मध्यम प्रकल्पामध्ये गेल्या आठवड्यात ८.२२० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता तो या आठवड्यात घटला असून ७.९९१ दशलक्ष घनमीटर झाला आहे. गडनदी प्रकल्पामध्ये गेल्या आठवड्यात ५९.०४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. या आठवड्यात ५८.६२३ दशलक्ष घनमीटर झाला आहे तर अर्जुना धरणामध्ये ५८.५४६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता तो या आठवड्यात ५८.०११ एवढा झाला आहे. अर्जुना प्रकल्पाचा पाणीसाठा दिलासा देणारा आहे तर जिल्ह्यातील ४६ लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये एकूण पाणीसाठ्याची क्षमता २२९.४३ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेल्या आठवड्यात तो पाणीसाठा ८७.६३ टक्के एवढा होता. या आठवड्यात हा साठा ८३.७९ टक्के एवढा झाला आहे. म्हणजे सुमारे ४.४० टक्के पाण्याचे या कडक उन्हाळ्यात बाष्पीभवन झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.