आठवडाभरानंतर जिल्ह्यात पावसाची विश्रांती 

रत्नागिरी:- पश्‍चिम महाराष्ट्रात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर केर्ली येथे पाणी आल्यामुळे वाहतूक थांबविण्यात आली होती. कोल्हापूरहून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून रत्नागिरी श्रावणधारांचा अनुभव घेत आहेत.

बुधवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी ६५.६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ७७.६०, दापोली ६९.४०, खेड ९९.८०, गुहागर ६४.३०, चिपळूण ९७.९०, संगमेश्वर ३९.२०, रत्नागिरी ३७.१०, लांजा ४६.५०, राजापूर ५९.३० मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात १ जुन पासून आतापर्यंत सरासरी २२१३.९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी दिवसभरात सरींचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी, अर्जूना, बावनदी, काजळी नद्यांची पाणीपातळी कमी झाली असून पूरपरिस्थिती नियंत्रणात आले. विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत आहे. नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील भडकंबा मुस्लिमवाडी येथे साकव खचला आहे. किरबेट येथील राजाराज सुर्वे यांच्या घराचे १५ हजार रुपये, यशवंत कोटकर यांच्या घराचे १० हजार रुपये, विठ्ठल रखुमाई मंदिरावर झाड पडल्यामुळे छताचे २४ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले. खेड कुपरेवाडी येथील एका घराची पडझड झाली आहे. शेल्डी येथील एका घराचे आणि पुर्ये-देवळेतील एका घराचे १० हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरीही पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. तेथील नद्यांना पूर आला असून महामार्गावरील वाहतूक खंडीत झाली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर केर्ली येथे वहाळाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे दुपानंतर वाहतूक थांबविण्यात आली होती. या मार्गावरुन रत्नागिरीकडे येणार्‍या गाड्या वाठार मार्गे सोडण्यात येऊ लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत पूरपरिस्थिती कायम होती. गगनबावडा मार्गावरील वाहतूकही थांबविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.