आठवडाभरातील पावसामुळे सरासरी गाठली

जिल्ह्याची स्थिती; भात लावणीला समाधानकारक

रत्नागिरी:- मागील आठवडाभरात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची सरासरी गाठणे शक्य झाले आहे. या पावसाने भातलावणीच्या कामांनाही वेग आला आहे.

यंदाच्या मोसमात मान्सून नियोजित वेळापत्रकापेक्षा काही दिवस आधीच येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता; पण तो चुकीचा ठरला. १० जूनपासून सुरू झालेल्या पावसातही विशेष जोर नव्हता. त्यामुळे दरवर्षी जून महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सरासरी सुमारे आठशे मिलिमीटर पाऊस पडतो; पण यंदाच्या वर्षी जूनअखेर जेमतेम सुमारे सहाशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर १ जून ते ५ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण ९७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ५ ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात पावसाचा जोर वाढतच राहिला. त्यामुळे १ जून ते ९ जुलैपर्यंतच्या कालावधीची एकूण सरासरी १३४७.४४ मिलीमीटर झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात एकूण सरासरी १३४०.४४  मिलिमीटर पाऊस झाला होता. जून महिन्यात पावसाचा जोर कमी राहिल्याने भातलावण्या उशिराने सुरू झाल्या; परंतु जुलै महिन्यात मुसळधार पावसाला आरंभ झाल्यानंतर लावण्यांची कामे वेगाने सुरू झाली आहेत.

दरम्यान, शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात एकूण सरासरी ३८.२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी लांजा तालुक्यात सर्वाधिक ३१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्या खालोखाल मंडणगड २७, खेड ६७, चिपळूण ३५, राजापूर ५३, दापोली १३, संगमेश्वर ५४, रत्नागिरी ३२, गुहागर ३२ या तालुक्यांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहिला. येत्या १२ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.