आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विधी सेवा समाजाच्या दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहचवणार

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव आनंद सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

रत्नागिरी:- आझादी का अमृत महोत्सव व भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे याचा स्मरणोत्सव साजरा करण्याचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता प्रतिमा पूजन आणि 9.30 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बार असोसिएशनच्या सहकार्याने समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहचून नागरिकांचे मूलभूत हक्क काय आहेत याची जाणीव करुन देणार आहे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत, त्या संबंधित घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा विधी सेवा गावोगावात उपक्रम घेणार असून अनाथ,निराधार यांनाही त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव आनंद सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुळात जिल्हा विधी सेवा शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे, लोकअदालतव्दारे समजस्यांने प्रकरणांवर तोडगा काढून न्याय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका विधी सेवा बजावते. समाजातील निराधार, गरजू लोकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होवूनही नागरिकांना लाभ मिळत नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेवून आझादी का अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमाची मोहिम हाती घेण्याचा कार्यक्रम परिपत्रक विधी सेवा प्राधिकरणाला प्राप्त झाले आहे. यानुसार याची प्रभावी अंमलबजावणी 1 ऑक्टोबर पासून जिल्ह्यात होत आहे. यासाठी 44 कायदासाथी यांची मदतही घेण्यात येणार असल्याची माहिती आनंद सामंत यांनी दिली.

बालक स्नेही विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण 2015 ची योजना अंतर्गत जिल्ह्यातील निरीक्षणगृहांना स्पर्धा परिक्षा पुस्तके, संगणक, टीव्ही, इंग्लिश ग्रामर, पौराणिक कथा पुस्तके, खेळाचे साहित्य व मार्गदर्शन वर्ग घेतले जाणार आहे. ही सगळी जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांना सगळ्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी लक्ष दिले जाणार आहे. गावोगावात शासनाच्या आणि विविध कायद्याची जनजागृती करण्यासाठी कायदासाथी मार्गदर्शन करणार आहेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स राखून कार्यक्रम घेतले जाणार आहेत.